नवीन ई-पीक पाहणी ॲपमधून हापूस गायब
‘कोकण रुची’ हाच पर्याय उपलब्ध; सरकारी नोंदीत हापूसची स्वतंत्र ओळख धोक्यात
रत्नागिरी :- शेतकऱ्यांनी शेतात घेतलेल्या पिकांची अचूक व पारदर्शक नोंद डिजिटल स्वरूपात सातबारा उताऱ्यावर व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी केली जाते. यंदा शासनाकडून डीसीएस या नवीन ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात येत आहे. मात्र, या ॲपमध्ये कोकणातील प्रमुख आंबा पीक असलेल्या ‘हापूस’ किंवा ‘अल्फान्सो’ या नावाचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीन ॲपमध्ये आंबा पिकाच्या नोंदीसाठी कोकणातील आंब्याकरिता केवळ ‘कोकण रुची’ हा पर्याय उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हापूस आंब्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची नोंद कोणत्या नावाने करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पीक विमा मिळविणे, पीक कर्ज वाटप, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच महसूल नोंदीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे. ही पाहणी शेतकरी स्वतः किंवा सहाय्यकांच्या माध्यमातून करणार आहेत. त्यामुळे ॲपमध्ये उपलब्ध पर्यायावरच पिकाची नोंद करावी लागणार असल्याने हापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हापूस आंब्याची नोंद ‘कोकण रुची’ या नावाने झाल्यास भविष्यात प्रत्यक्ष शेतातील पीक आणि सरकारी नोंदी यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते. पीक विम्याचा दावा करताना प्रत्यक्ष पीक आणि सातबारा अथवा ई-पीक पाहणीतील नोंद यामध्ये विसंगती आढळल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
महसूल नोंद आणि सातबारा उतारा हा शेतकऱ्याच्या पिकाचा अधिकृत सरकारी पुरावा मानला जातो. त्यामुळे हापूस आंब्याची स्वतंत्र नोंद उपलब्ध नसल्यास भविष्यात संबंधित शेतकरी हापूस उत्पादक असल्याचे अधिकृत नोंदीतून सिद्ध करण्याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम कृषी कर्ज, पीक विमा तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
कोकणातील हापूस आंब्याला देश-विदेशात स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीच्या नवीन ॲपमध्ये ‘हापूस’ किंवा ‘अल्फान्सो’ या नावाचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. सरकारी नोंदीत पिकाची अचूक ओळख कायम राहण्यासाठी शासनाने याबाबत तातडीने स्पष्टता करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.