मोबाईल हॅक करून ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंटची ५.६६ लाखांची फसवणूक
डेबिट कार्डच्या माध्यमातून दोन लाखांची रक्कम वळवली; क्रेडिट कार्डचे ३.६६ लाखांचे बिलही भरले
रत्नागिरी, : मोबाईल हॅक करून बँक खात्याची माहिती मिळवत ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे रकमेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार शनिवारी (ता. २६) रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास अवघ्या २३ मिनिटांच्या कालावधीत शहरातील तेलीआळी येथील ज्युतिका अपार्टमेंटमध्ये घडला. याप्रकरणी रविवारी (ता.२७) ला शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बिपीन रसिकलाल शहा (वय ५७, व्यवसाय चार्टर्ड अकाउंटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ऑपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) हे कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचा गैरवापर करून कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड इश्यू करून घेतले. या डेबिट कार्डच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या कॅनरा बँकेतील जॉइंट खात्यातून २ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईल बँकिंगचा वापर करून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रक्कमेचे क्रेडिट कार्ड बिलही भरले. अशा प्रकारे अज्ञाताने फिर्यादी यांच्या बँक खात्यांशी संबंधित माहितीचा गैरवापर करून एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे रकमेची ऑनलाइन फसवणूक केली.
या प्रकरणी फिर्यादी रसिकलाल शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क), ६६(ब) आणि भारतीय दंड विधानातील कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.