भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; स्वाराचा मृत्यू, महिला जखमी
रत्नागिरी: पाली येथून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (ता. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाली येथील सबुरी हॉटेल लॉजसमोरील रस्त्यावर घडला. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गुणाजी बारे (वय ५२, रा. पाली-बाजारपेठ, एसटी स्टॅण्डजवळ, रत्नागिरी) हे पत्नी मिनल मनोहर बारे यांच्यासोबत दुचाकी (एमएच-०८-एसी-४९७३) वरून वळके येथे कार्यासाठी जात होते. पाली येथील सबुरी हॉटेल लॉजजवळून ते पेट्रोल पंपाच्या दिशेने वळत असताना मागून आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील मनोहर बारे आणि त्यांच्या पत्नी मिनल हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. धडकेमध्ये मनोहर बारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिनल बारे यांनाही दुखापत झाल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील मोटार (एमएच-१४-एलयू-९७८७) सुशांत रमेश नेर्लेकर (वय ३८, रा. कोल्हापूर) चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी मोटारचालक सुशांत नेर्लेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.