भरधाव दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्र जखमी
चिपळूणमध्ये अपघातानंतर चालक गाडी जागीच सोडून पसार
रत्नागिरी:
चिपळूण शहरात रस्ता ओलांडणाऱ्या पिता-पुत्राला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर आरोपी चालक आपली मोटारसायकल घटनास्थळीच सोडून पळून गेला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चिपळूण शहरातील ‘आनंदऋची’ हॉटेलसमोर, बहादूरशेख नाका ते चिंचनाका जाणारे हायवे रोडवर घडला. फिर्यादी अक्षय नारायण कलकटकी (वय ३५, रा. गांधीनगर, वडारकॉलनी, चिपळूण) यांचे मावसभाऊ अमोल सहदेव वडार आणि त्यांचा मुलगा दुर्वांश अमोल वडार हे रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी आरोपी प्रमोद महादेव जाधव (वय ३१, रा. श्री अपार्टमेंट, चिपळूण) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. MH 08 BL 1160) रस्त्याची विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिशय हयगयीने, बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवत होता. त्याने रस्ता ओलांडणाऱ्या पिता-पुत्राला जोरदार धडक दिली.
या अपघातात अमोल वडार व त्यांचा लहान मुलगा दुर्वांश वडार यांना लहान-मोठ्या व गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघात घडल्यानंतर आरोपी प्रमोद जाधव आणि त्याचा मित्र अभिजित कुळे हे दोघेही आपली दुचाकी घटनास्थळीच टाकून तिथून पसार झाले.
या प्रकरणी अक्षय नारायण कलकटकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद महादेव जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.