कोकणातील शेतकऱ्यांना भरीव मदत करा
आमदार भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
चिपळूण: राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच 265 तालुक्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात जाहीर करण्यात आला आहे. याचदरम्यान आता राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील शेतीच्या नुकसानीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. अनियमित पावसामुळे कोकणातील भात आणि नाचणी पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दुष्काळाची झळ आता कोकणालाही बसत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना दुष्काळाच्या निर्णयात कोकणाचा अपेक्षित विचार का करण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
कोकणात यंदा पावसाच्या अनियमिततेचा आणि प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. भातासह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त भाग निश्चित करताना कोकणातील परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.”कोकणाला दुष्काळाची झळ बसत असताना मदतीपासून कोकण वंचित का? शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही दुष्काळाच्या निर्णयात कोकणाचा अपेक्षित विचार का झाला नाही?” असा सवाल त्यांनी केला. कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने कोकणातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
कोकणातील शेतकरीही प्रतिकूल हवामानाचा सामना करत असताना सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी जाधव यांची मागणी आहे. त्यांनी यापूर्वीही कोकणातील भातशेती व फळबागांच्या नुकसानीबाबत सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मार्च 2026 मध्ये सरकारने आंबा-काजू उत्पादकांसाठी हेक्टरी 22 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्यानंतरही जाधव यांनी मदतीच्या प्रमाणावर टीका केली होती.