प्रलंबित वाद तडजोडीने मिटवण्याची विशेष मोहीम
जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम
रत्नागिरी:
न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलद गतीने व्हावा आणि पक्षकारांमधील वाद सामोपचाराने मिटावेत, यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पातळीवर ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ ही विशेष मध्यस्थी मोहीम राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑक्टोबर पासून या मोहिमेची सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी दिली आहे.
ही विशेष मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत चालणार आहे. या तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले दिवाणी दावे, कौटुंबिक वाद आणि तडजोडपात्र फौजदारी खटले मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून आपापसातील समझोत्याने कायमचे मिटवले जाणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचवण्यासाठी ही मोहीम पक्षकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मागील दोन टप्प्यांना जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद
यापूर्वी राबवण्यात आलेल्या पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘मेडीएशन फॉर नेशन १.०’ हे अभियान १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबवले गेले होते. त्यात एकूण १,८३४ प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठवण्यात आली होती, ज्यापैकी ९१ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली होती. त्यानंतर २ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबवलेल्या ‘मेडीएशन फॉर नेशन २.०’ अभियानात ८२२ प्रकरणे संदर्भित करण्यात आली होती आणि त्यातील ५४ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा झाला होता. आता ३.० या तिसऱ्या टप्प्यात अधिकाधिक प्रकरणांचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
१५ विविध प्रकारच्या श्रेणीतील वादांचा समावेश
या मोहिमेत नागरिकांना आपल्या अनेक प्रकारच्या प्रलंबित वादांवर तोडगा काढता येणार आहे. यामध्ये वैवाहिक वाद, कौटुंबिक हिंसाचार, मोटार अपघात भरपाई, चेक बाऊन्सची प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी खटले, ग्राहक तक्रार निवारण मंचाची प्रकरणे, कर्ज वसुली, दरखास्त, लवाद प्रकरणे, वाणिज्यिक वाद, सेवा विषयक वाद, मालमत्तेच्या वाटपाचे दाव, बेदखलपात्र प्रकरणे, भूसंपादन, कामगार न्यायालयातील वाद आणि विविध न्यायाधिकरणांमधील प्रकरणांचा समावेश आहे. एकूण १५ वेगवेगळ्या श्रेणीतील वाद निवडून ते मध्यस्थी प्रक्रियेसाठी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विनोद यशवंतराव जाधव यांनी जिल्ह्यातील नागरिकांना, पक्षकारांना आणि वकिलांना या विशेष अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे ताणतणावात खटले लढवण्यापेक्षा मध्यस्थी केंद्राच्या मदतीने वादावर कायमचा आणि सन्मानजनक तोडगा काढणे दोन्ही पक्षांच्या हिताचे असते. त्यामुळे नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे मध्यस्थी केंद्राकडे पाठवून या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश विनोद जाधव यांनी केले आहे.