चाकरमान्यांची मुंबईला परतीची वाट बिकट
चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा
चिपळूण: गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाल्यानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मात्र, वाहतूक कोंडीपेक्षा सीएनजीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा ठरत आहेत. आठ किलो सीएनजी भरण्यासाठी वाहनचालकांना दहा ते बारा तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
दहा किलो क्षमतेच्या सीएनजी टाकीत साधारण आठ किलो सीएनजी भरला जातो. गणेशोत्सवामुळे चिपळूण शहरासह ग्रामीण भागात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात सीएनजीवर धावणाऱ्या चारचाकी आणि रिक्षांची संख्या वाढल्याने पंपांवर ताण आला आहे. चिपळूण शहर व परिसरात केवळ तीन सीएनजी पंप उपलब्ध आहेत. त्यामुळे वाढलेल्या वाहनसंख्येच्या तुलनेत पंपांची संख्या अपुरी पडत आहे.
सीएनजीचा पुरवठा वेळेवर होत असला तरी एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहने दाखल होत असल्याने वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत लागल्याचे चित्र आहे. पिंपळी, वालोपे, कामथे तसेच चिपळूण शहरातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. अनेक वाहनचालक रांगेत जागा टिकवून ठेवण्यासाठी तासन्तास वाहनांमध्येच थांबत आहेत.
परिणामी, कुटुंबासह परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांना नियोजित वेळेत पुढील प्रवास करता येत नाही. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता सीएनजी पंपांची संख्या आणि उपलब्धता वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे. वाहतूक कोंडी टाळून मार्गस्थ झालेल्या चाकरमान्यांना आता इंधनासाठीच्या रांगेमुळे वेळ खर्च करावा लागत आहे.