गौरी गणपती विसर्जनानंतर मासळी बाजारात मोठी गर्दी
रत्नागिरी:
पवित्र श्रावण महिना आणि गौरी गणपती विसर्जन होताच पहिल्या रविवारी रत्नागिरीतील मत्स् यप्रेमींनि मासळी बाजारात मोठी गर्दी केली. श्रावण महिन्याभरात पाळण्यात आलेल्या मांसाहार वर्ज्यतेच्या नियमांनंतर, गणपती विसर्जनानंतर नागरिक मोठ्या उत्सुकतेने मासळी बाजारात दाखल होत आहेत. याचाच प्रत्यय रविवारी रत्नागिरीतील प्रसिद्ध मिरकरवाडा बंदरावर पाहायला मिळाला, जिथे सकाळीच मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची तुफान झुंबड उडाली होती.
मिरकरवाडा येथील मच्छी मार्केटमध्ये विविध प्रकारची ताजी मासळी उपलब्ध झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा आणि हलवा यांसारख्या आवडत्या माशांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली होती. बाजारात आवक उत्तम असल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळाले. खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे बंदरावरील संपूर्ण वातावरण गजबजले होते.
मासे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सकाळपासूनच मार्केटमध्ये गर्दी केल्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठे उधाण आले होते. विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील चढाओढीने बंदराचा परिसर गजबजून गेला होता. आगामी काळातही माशांची आवक अशीच कायम राहिल्यास मासळी बाजारातील हीच गजबज आणि खवय्यांचा उत्साह असाच कायम राहील, असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.