वेळंब येथे बंद घर फोडून सव्वा लाखांचे दागिने, रोकड लंपास
रत्नागिरी, ता. १५ : गुहागर तालुक्यातील वेळंब-गुरववाडी येथे बंद घराचे कुलूप-कडीकोंयडा व खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ७१ हजार ४२ रुपयांचा ऐवज लंपास केला. गुहागर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
ही घटना रविवारी (ता. १३) रात्री नऊ ते (ता. १४) सकाळी नऊ या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुनम गजानन गुरव (वय ३४, गृहिणी, रा. वेळंब-गुरववाडी, ता. गुहागर) सध्या त्या मुंबईतील कांदिवली पूर्व येथील श्री सद्गुरू सोसायटीमध्ये राहत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्या गावातील घरी आल्या असताना चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १३ ला रात्री नऊच्या सुमारास घर बंद करून त्या बाहेर गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता घरी परतल्यानंतर घराच्या कडी-कुलपाचा आणि खिडकीचा भाग तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील तसेच पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे आढळले.
चोरट्याने ३३.३९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (९९ हजार २९२ रुपये), १० ग्रॅम सोन्याची साखळी (२८ हजार ५०० रुपये), पाच ग्रॅम सोन्याची साखळी (१४ हजार २५० रुपये), दोन सोन्याच्या अंगठ्या (४ हजार रुपये), दोन ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके (११ हजार ५०० रुपये), दोन ग्रॅम सोन्याच्या नथी (४ हजार रुपये) असा सोन्याचा ऐवज चोरून नेला.
याशिवाय ३० ग्रॅम चांदीची साखळी (२ हजार रुपये), १५ ग्रॅम चांदीची साखळी (१ हजार १०० रुपये), दोन चांदीच्या कमरेच्या साखळ्या (१ हजार ४०० रुपये), १० ग्रॅम चांदीचे कडे (७०० रुपये) तसेच ४ हजार ३०० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ७१ हजार ४२ रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
या प्रकरणी त्यांनी सोमवारी (ता.१४) दुपारी ४.०३ वाजता गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.