अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली: दापोली नवानगर येथे ॲक्टिवा स्कूटर घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संजय जानू कदम (वय ५१, रा. आपटी गणेश कॉलनी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर व दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६७/२०२६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे) नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय कदम हे २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदऊ वाजण्याच्या सुमारास नवानगर, दापोली येथे आपली ॲक्टिवा स्कूटर (क्रमांक MH 08 X 9961) घेऊन जात होते. यादरम्यान त्यांची स्कूटर स्लिप होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्यात व शरीराच्या इतर भागा गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गांभीर्य लक्षात घेता त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी आठ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न रगोदी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातून दापोली पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:३१ वाजता दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.