मिलिंद कदम देवरूख पंचायत समितीत सहायक लेखाधिकारीपदी रुजू
चिपळूण:
२०२३ सालापासून गुहागर पंचायत समितीत अतिरिक्त सहायक लेखाधिकारी पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळणारे खेरशेत गावचे सुपुत्र श्री. मिलिंद काशिराम कदम हे दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी देवरूख पंचायत समितीत पदोन्नतीने सहायक लेखाधिकारीपदी रुजू झाले आहेत. या प्रसंगी विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देवरूख पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, गटविकास अधिकारी आनंद लोकेरे, सहायक गटविकास अधिकारी अक्षय पाटील, कृषी अधिकारी परेश सुर्वे यांच्यासह पंचायत समितीतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री. मिलिंद कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
श्री. मिलिंद कदम यांच्या शासकीय सेवेची सुरुवात १९९१ साली संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई येथे कनिष्ठ सहायक (लिपीक) म्हणून झाली. त्यानंतर २००५ साली ते चिपळूण पंचायत समितीत कनिष्ठ सहायक (लिपीक) पदावर रुजू झाले. २०१३ साली संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कनिष्ठ सहायक (लिपीक) पदभार त्यांनी सांभाळला. पुढे २०१६ साली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कनिष्ठ सहायक (लेखा) या पदावर त्यांची नियुक्ती झाली. २०१७ साली वरिष्ठ सहायक (लेखा) पदावर त्यांना पदोन्नती मिळाली.
जिल्हा परिषदेत उत्तम सेवा बजावल्यानंतर २०१९ साली गुहागर पंचायत समिती येथे बदलीने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदावर ते रुजू झाले. २०२३ साली त्यांना गुहागर पंचायत समिती येथे कनिष्ठ लेखाधिकारीपदी पदोन्नती मिळाली होती. आता श्री. कदम देवरूख पंचायत समितीत पदोन्नतीने सहायक लेखाधिकारीपदी रुजू झाले आहेत.
त्यांच्या या नव्या पदभाराबद्दल सहायक प्रशासन अधिकारी सुनिल लोंढे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद शिगवण, शिक्षक नेते बबन बांडागळे, श्रीकृष्ण जागुष्टे, अशोक भालेकर, प्रकाश कांबळे आदींनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.