एम क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडीची बाजी; पुणे येथील फँटम ग्रँड यु-१२ कपवर कोरले नाव
सावंतवाडी:
मॅक फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या ‘फँटम ग्रँड यु-१२ कप’ क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या ‘एम क्रिकेट ॲकॅडमी’ने अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात सार्क आर. के. स्पोर्ट्स क्लब पुणेचा ६ धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले. या रोमहर्षक विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सदर स्पर्धा जून महिन्यात पुणे येथे खेळवली गेली होती. या स्पर्धेत पुण्यातील नामांकित सात क्लब आणि एम क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी अशा एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. लीग फेरीतील ७ पैकी तब्बल ६ सामने जिंकत एम क्रिकेट ॲकॅडमीने दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र पाऊस आणि इतर तांत्रिक कारणांमुळे अंतिम सामना लांबणीवर पडला होता. अखेर हा अंतिम सामना १० सप्टेंबर रोजी पुणे येथील पीडीसीएच्या मैदानावर पार पडला.
अंतिम सामन्यात एम क्रिकेट ॲकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सार्क आर. के. स्पोर्ट्स क्लबच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापुढे एम क्रिकेट ॲकॅडमीचा संपूर्ण संघ ३५ षटकांत ८३ धावांवर तंबूत परतला. यात कर्णधार निहाल पेडणेकरने सर्वाधिक २३ धावा केल्या, तर त्याला साथ देताना तेजल परबने १२, दैविक व्यंगणकरने ९ आणि सिद्धांत सावंतने ७ धावांचे योगदान दिले.
८४ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सार्क आर. के. स्पोर्ट्स क्लबविरुद्ध एम क्रिकेट ॲकॅडमीच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नियंत्रित मारा केला. एम क्रिकेट ॲकॅडमीच्या भेदक मारा आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणापुढे सार्क आर. के. स्पोर्ट्सचा संपूर्ण संघ ७८ धावांवर गारद झाला आणि एम क्रिकेट ॲकॅडमीने ६ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
एम क्रिकेट ॲकॅडमीकडून गोलंदाजीत कर्णधार निहाल पेडणेकरने सुरेख कामगिरी करत ४ गडी बाद केले. त्याला उत्तम साथ देत तनिष सावंतने २, तर श्रेयश कांबळी, आयुष निर्गुण, यश जाधव आणि आयुष गवस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोलंदाजीसोबतच करन गावडे, सिद्धांत सावंत, तनिष सावंत, सोनिक पडते आणि कर्णधार निहाल पेडणेकर यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अप्रतिम झेल टिपले.
सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कर्णधार निहाल पेडणेकरला ‘सामनावीर’ (मॅन ऑफ द मॅच) पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत १७ बळी घेणाऱ्या आयुष निर्गुणला ‘उत्कृष्ट गोलंदाज’ आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल ‘मालिकावीर’ (मॅन ऑफ द सिरीज) पुरस्कार देण्यात आला. या यशस्वी संघाला अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या संपूर्ण स्पर्धेत संघासोबत राहून सहकार्य करणारे रत्नागिरीचे सी. सावंत साहेब यांचे अकॅडमीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.