भोस्ते घाटात वॅगनारची मोटरसायकलला धडक
महिला गंभीर जखमी, चालक पसार
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात वळणावर भरधाव कारने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, धडक देऊन चालक कारसह पसार झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किरण संजय जंगम (रा. खोपी, श्रीरामनगर, खेड) यांचा आतेभाऊ संकेत जंगम हा त्याच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर (क्र. MH BA 1153) आत्या नीलम चंद्रकांत जंगम (वय ५२, रा. पिरलोटे, खेड) यांना मागे बसवून खेड येथील डॉ. साळुंखे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी जात होता.
ते मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणकडून खेडच्या दिशेने जात असताना भोस्ते घाट वळणावर आले असता, पाठीमागून वेगाने आलेल्या एका काळ्या रंगाच्या वॅगनार कारने (क्र. MH 06 CU 0843) त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. अपघात घडल्यानंतर कारचालक निलेश भगवान मोरे (वय ३४, रा. कोळोसे, ता. महाड, जि. रायगड) हा आपली कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
या अपघातात नीलम चंद्रकांत जंगम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, संकेत जंगम याच्या डाव्या पायावर मुकामार लागला आहे; तसेच मोटरसायकलचेही नुकसान झाले आहे. १० सप्टेंबर रोजी पहाटे ६:०० वाजता या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १८४, १३४(ब) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.