रत्नागिरी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१२० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये कुस्तीचे सामने घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे प्रमुख नवनाथ जाधव यांनी संपूर्ण स्पर्धेचे अत्यंत नियोजनबद्ध व सुंदर आयोजन केले. यावेळी कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी व ज्येष्ठ कुस्तीगीर मारुती पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सदानंद जोशी, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्री. भाई विलणकर सर तसेच तालुका समन्वयक विनोद मयेकर यांनी उपस्थित सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेस असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद तापेकर , जिल्हा संघटक फैय्याज खतीब, सदस्य मानसिंग पवार, सदस्या कमल नितोरे, विविध शाळांतील क्रीडा शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील सामने निष्पक्ष व नियमानुसार पार पाडण्यासाठी अनुभवी पंचांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मारुती गलांडे सर, सैफुदुद्दीन पठाण सर, भावेश सावंत, अतुल गराटे, गणेश गराटे, प्रणय गराटे, एम. डी. पाटील सर व जाकीर सय्यद यांनी पंच म्हणून आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली.
विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि कुस्ती या पारंपरिक क्रीडा प्रकाराला नव्या पिढीतून सक्षम खेळाडू मिळावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरला.
तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे रत्नागिरी तालुक्यातील शालेय क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही अशाच प्रकारे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा मानस आहे.