संगमेश्वरातील ३२ शिक्षकांच्या बदल्या रद्द
संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात नियम व कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या कामगिरी बदल्यांचा प्रकार प्रसारमाध्यमांनी समोर आणल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी केली. चौकशीत नियमबाह्य बाबी समोर आल्यानंतर ३२ शिक्षकांच्या कामगिरी बदल्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
केवळ बदल्या रद्द करून हे प्रकरण संपवू नये, अशी भूमिका आता पालक आणि तालुकावासीयांनी घेतली आहे. या नियमबाह्य बदल्यांचे आदेश नेमके कोणाच्या माध्यमातून आणि कोणाच्या दबावाखाली काढण्यात आले, तसेच यामागे शिक्षण विभागातील मुख्य ‘सुत्रधार’ कोण आहे, याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
संगमेश्वर तालुक्यात एकूण ४६ कामगिरी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी तब्बल ३२ बदल्यांमध्ये सेवाज्येष्ठता, अंतराची मर्यादा आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. आपल्या मर्जीतील आणि सोयीच्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी नियुक्त करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर दुसरीकडे राजकीय किंवा प्रशासकीय आधार नसलेल्या शिक्षकांवर दूरवरच्या शाळांमध्ये कामगिरी बदली लादण्यात आल्याचा आरोप आहे.
ऐन शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर झालेल्या या बदल्यांमुळे तालुक्यातील शाळांमधील अध्यापन व्यवस्थेवर परिणाम झाला. नवा शिक्षक रुजू झाल्यानंतर लगेचच पुन्हा बदलीचा प्रकार सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. अन्यायकारक बदल्या स्वीकारून नव्या ठिकाणी हजर झालेल्या शिक्षकांनाही पूर्ण क्षमतेने अध्यापन करणे कठीण झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता.
डाटा ऑपरेटर, सरपंच ते पंचायत समिती सभापती असा प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून गंभीर दखल घेतली. त्यानंतर ३२ शिक्षकांच्या कामगिरी बदल्या रद्द करण्यात आल्याने संबंधित शिक्षकांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नियमबाह्य आदेश काढले जात असताना शिक्षण विभागातील जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचारी काय करत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामागे कोणाचा आशीर्वाद किंवा दबाव होता, याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पालक व तालुकावासीयांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर विभागीय चौकशी आणि कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ३२ शिक्षकांच्या कामगिरी बदल्या रद्द झाल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणामागील जबाबदार व्यक्तींवर कारवाई होते की प्रकरण येथेच थांबते, याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.