संगमेश्वर, लांजात जुगार अड्ड्यांवर कारवाई
मटका चालविणाऱ्या दोघांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडी तिठा आणि लांजा तालुक्यातील कोर्ले रोड परिसरात विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ५ सप्टेंबर रोजी दिवसभरात हे दोन स्वतंत्र कारवाईचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३७ वाजता साखरपा भंडारवाडी तिठा जवळील एका भंगार दुकानाचे आडोशाला (ता. संगमेश्वर) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे यांनी फिर्याद दिली असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३:२७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी दत्ताराम विश्राम चाळके (वय ६५, रा. कोंडगाव सोनारगल्ली, ता. संगमेश्वर) हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका जुगार खेळ चालवताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये १००० रुपयांची रोख रक्कम आणि इतर जुगार साहित्याचा समावेश आहे.
५ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजता लांजा ते कोर्ले जाणारे रोडवरील ॲक्टीव्ह चायनिज सेंटरच्या जवळील एका बंद टपरीच्या आडोशाला (ता. लांजा) ही दुसरी कारवाई झाली. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अजिज रमजान नदाफ (नेमणूक ८९६, लांजा पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा नोंदवला गेला.
आरोपी भारत परशुराम कांबळे (वय ४८, शिक्षण ७ वी, रा. देवधे बौद्धवाडी, ता. लांजा) हा मटका जुगाराचा खेळ चालवत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४०३५ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. यामध्ये ७१५ रुपयांची रोख रक्कम, ३०० रुपये किमतीची एक किसान कंपनीची फिकट चॉकलेटी रंगाची प्लास्टिकची खुर्ची, ३००० रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल आणि २० रुपये किमतीचे इतर जुगार साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) नुसार संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.