दोन कारची समोरासमोर धडक;दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी
राजापूर :- मुंबई – गोवा महामार्गावरील गंगातिठा परिसरात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले . अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयासह शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मुंबई, कल्याणकडे जाणारी (एमएच ०५ एफव्ही ७२६९) ही कार भरधाव वेगाने जात होती. गंगातिठा परिसरात आल्यानंतर अचानक ही कार विरुद्ध दिशेला वेगाने सरकली. त्याचवेळी समोरून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या (एमएच ४६ सीएच ९१९६) या कारला तिची जोरदार धडक झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोन्ही वाहनांतून नेमके किती प्रवासी प्रवास करीत होते आणि त्यापैकी कितीजण जखमी झाले, याची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.
अपघातानंतर जखमींना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.