जिल्ह्यात अवैध मटका जुगारावर पोलिसांचा दणका
तिघांवर गुन्हे दाखल , हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन मटका चालकांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना चिपळूण शहरातील शिवनदी परिसरातील ‘ग्लास अँड गो’ सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूला घडली. १ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास आरोपी केशव धोंडू टेरवकर (वय ६६, रा. मुरादपूर, कुंभारवाडी, ता. चिपळूण) हा दैनिकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘डे महाराष्ट्र’ या मटका जुगाराच्या आकड्यांवर बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे स्वीकारून खेळ चालवत होता.
याबाबत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सदाशिव माणके (वय ४३) यांनी तक्रार दाखल केली असून, १ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून १,२६० रुपयांची रोख रक्कम, १० रुपयांची पावती पुस्तक आणि पेन असा एकूण १,२७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दुसरी कारवाई अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सप्टेंबर रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोफळी येथील एम.एस.ई.बी. कॉलनी रस्त्या लगतच्या इमारतीबाहेर, पडक्या वडाच्या झाडाखाली आरोपी रमेश यशवंत खराडे (वय ६०, व्यवसाय- मोलमजुरी, रा. पोफळी मार्केट, ता. चिपळूण) हा बेकायदेशीरपणे ‘मुंबई मटका’ चालवत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
महिला पोलीस कॉन्स्टेबल जान्हवी जितेंद्र महाडीक (वय ३२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ६२० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तिसरी घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास गुहागर तालुक्यातील मौजे जामसुत सहानवाडी येथे घडली. तेथील विश्वनाथ साळवी यांच्या नारळाच्या बागेतील एका पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी सुनील बाळा दाते (वय ५८, रा. खेर्डी दातेवाडी, ता. चिपळूण) हा ‘डे महाराष्ट्र’ मटक्याचा खेळ चालवत होता.
चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल वृशाल सगुण शेटके (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत २,५५० रुपयांची रोख रक्कम आणि पेन असा एकूण २,५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या या मोहिमेमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.