रत्नागिरीत पोलिसांवर गाडी घालून पळणारा गोवंश तस्करांचा टोळका जेरबंद; टोळीचा पर्दाफाश
पोलिसांच्या धडक कारवाईत मुंबईचे दोन आरोपी जेरबंद
रत्नागिरी:
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फणसवळे परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्राणाची पर्वा न करता एका आरोपीला जागीच पकडले, तर दुसऱ्या आरोपीला जंगलात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शोधून काढले. या प्रकरणी मुंबईतील दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फणसवळे गावच्या जंगलमय परिसरात गत २० ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा (गुन्हा रजि. नं. १६५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३२५) तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत होते. या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तैनात करण्यात आले होते.
दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली तसेच पोलीस अंमलदार संकेत महाडीक, सागर साळवी आणि स्वप्निल तेरवणकर हे पथक फणसवळे परिसरातील करबुडे फाटा ते फणसवळे या मार्गावर गस्त घालत होते. गस्तीदरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळाजवळील दाट जंगलमय भागात झाडीझुडपांच्या आड एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
संशय बळावल्याने पोलीस पथक वाहनाची पाहणी करण्यासाठी जवळ गेले असता, वाहनातील आरोपींनी पकडले जाण्याच्या भीतीने थेट पोलिसांच्याच अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. मात्र मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचे शासकीय वाहन उभे असल्याने आरोपींना त्या बाजूने पळ काढता आला नाही. त्यामुळे आरोपींनी वाहन मागे घेऊन जंगलमय मार्गाने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच दरम्यान वाहनाच्या पुढील चाकांमध्ये एक बेशुद्ध अवस्थेतील गोवंश जनावर अडकल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही आणि जागीच थांबले.
वाहन अडकताच आरोपी वाहनातून उतरून अंधारात जंगलाच्या दिशेने धावू लागले. यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी अत्यंत धाडसाने झडप घालून झटापटीनंतर मोहसीन बाबू कुरेशी (वय ३० वर्ष, रा. मीरा रोड, मुंबई) यास घटनास्थळीच ताब्यात घेतले. दरम्यान, वाहनातील इतर आरोपींनी काळोखाचा फायदा घेत दाट जंगलात पलायन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक पालवे यांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून घेतला.
पहाटेच्या सुमारास संपूर्ण जंगलमय परिसरात ठिकठिकाणी व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. सुमारे सात तासांच्या अथक शोधानंतर सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जंगलात लपून बसलेला दुसरा आरोपी शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (वय ४८ वर्ष, रा. जनता सेवक सोसायटी, माहीम पश्चिम, मुंबई) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, जंगलात पळून गेलेल्या त्यांच्या अन्य दोन साथीदारांची नावे अस्लेम (रा. वांद्रे-कुर्ला, मुंबई) आणि देवा (रा. विरार) अशी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
या गंभीर घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १३२, ३३६(३), ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५, ५(क), ५(ख) व ९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी रत्नागिरी न्यायालयात हजर करण्यात येत असून गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस अंमलदार संकेत महाडीक, सागर साळवी, स्वप्निल तेरवणकर व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.