विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी; काही दिवस जोर कायम राहणार
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. काही ठिकाणी तुरळक पाऊस व्हायचा. त्यानंतर कडक उन्ह पडत होते. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी दुपारपर्यंत पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. लांजा, खेड, मंडणगडसह रत्नागिरीत रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी निराशा केली. अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे भात, नाचणी पिकांना धोका निर्माण झाला असून किटक, गोगलगायचा प्रार्दुभाव पडत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सप्टेंबर उजाडला असून मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली. लांजा, रत्नागिरी, मंडणगड, खेड तालुक्यात पाऊस जास्त पडत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी २ हजार ४५३ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी ३ हजार २६० मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत ८०० मि.मी. पाऊस यंदा कमी पडला आहे.