वेतोशी येथे फिल्मी स्टाईलने गोवंश हत्येतील दोघांच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;
रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे गोवंश हत्येचा सुरू असलेला प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अत्यंत वेगाने सापळा रचत आणि जीवाची पर्वा न करता पोलिसांनी हत्यारबंद आरोपींपैकी दोघांना अटक केली असून, तिसऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके जंगलात तैनात करण्यात आली आहेत.
बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असताना ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. पालवे यांच्या पथकाला या अवैध प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पालवे आणि त्यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली. करबुडे हायवेनजीक मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर गोवंश हत्येचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी अत्यंत जलद आणि धडाडीने कारवाई करत अंधारातच सापळा रचला. यावेळी गुन्हेगारांकडे हत्यारे होती आणि एका आरोपीने पोलिसांवर हत्यारही उगारले. मात्र, जिवाची पर्वा न करता पोलिसांनी अत्यंत वेगाने एका आरोपीला घटनास्थळावरूनच बेड्या ठोकल्या. अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या दुसऱ्या आरोपीला गुरुवारी सकाळी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले, तर तिसरा आरोपी जंगलात फरार झाला असून त्याच्या शोधासाठी कसून मोहीम राबवली जात आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोवंश मांस जप्त केले आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
या धडक कारवाईच्या वेळी पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांचीही मोठी मदत लाभली. सकाळी घटनास्थळी सरपंच निलेश लोंढे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार, पोलीस पाटील विष्णू ठीक तसेच ऋतुजा आंबेकर आदी उपस्थित होते. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.