रत्नागिरीत ‘रिमझिम रिमझिम’ काव्यमैफल उत्साहात
आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्थेकडून आयोजन
रत्नागिरी :
आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था (कोकण विभाग, रत्नागिरी) यांच्या वतीने अ. के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर ‘रिमझिम रिमझिम’ या विशेष काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेने प्रथमच स्त्री-पुरुष कवींचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला असून, पावसाळा आणि विविध भावविश्वावर आधारित २० कवी-कवयित्रींच्या सादरीकरणाने ही मैफल कमालीची बहारदार झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमा जोशी यांनी केले, तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी होत्या. नवकवींनी झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने लेखनाचा सराव करावा, असा मोलाचा सल्ला सुनेत्रा जोशी यांनी यावेळी दिला. राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ऋतुजा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले. मैफिल झाल्यानंतर उत्कृष्ट कविता व सादरीकरणासाठी सहभागींना पुस्तके प्रदान करण्यात आली, तर सर्व उपस्थितांना पेन देऊन गौरविण्यात आले. सर्व सादर कवितांचे ‘ई-बुक’ प्रकाशित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
ऋतुजा कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करताना अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर आणि कर्मचारी परब यांच्या मोलाच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. चहा, चटणी आणि गरमागरम बटाटेवड्यांच्या आस्वाद घेत या रंगलेल्या साहित्यिक सोहळ्याची सांगता झाली.