रत्नागिरीत मांडवी किनाऱ्यावर पोलीस बँडच्या गजरात दर्यादेवाला सुवर्ण नारळ अर्पण
रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सागरपूजन
रत्नागिरी:
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रत्नागिरीतील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आज संध्याकाळी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सागरपूजन पार पडले. परंपरेनुसार आणि मोठ्या दिमाखात पोलीस बँडच्या धून आणि मंगलमय गजराच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते दर्यादेवाला विधीवत नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी शहरातील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळपासूनच मांडवी किनाऱ्यावर सणाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. संध्याकाळी पोलीस ताफ्यासह पोलीस बँड पथकाचे किनाऱ्यावर आगमन झाले. बँडच्या वाद्यवृंदाने मांडवी किनाऱ्यावरील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि मंगलमय करून टाकले होते. त्यानंतर डीएसपी नितीन बगाटे यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत समुद्राच्या लाटांजवळ जाऊन विधीवत पूजा-अर्चा केली.
हातात नारळ घेऊन डीएसपी नितीन बगाटे आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी भर समुद्राकडे तोंड करून अत्यंत श्रद्धेने दर्यादेवाला प्रार्थना केली. “रत्नागिरीतील सर्व नागरिक, विशेषतः सागरी सीमेचे आणि समुद्रावर उपजीविका भागवणाऱ्या कोळी बांधवांचे रक्षण व्हावे, नैसर्गिक आपत्तींपासून सर्वांचा बचाव व्हावा आणि जिल्ह्यात सुख-शांती कायम राहावी,” अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.
प्रार्थनेनंतर जयघोषाच्या आणि टाळ्यांच्या गजरात डीएसपी नितीन बगाटे यांनी सागराला नारळ अर्पण केला. या पूजनानंतर उपस्थितांमध्ये आणि कोळी बांधवांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील वादळी वार्यांचा प्रभाव ओसरतो आणि कोळी बांधव पुन्हा एकदा नव्या आशेने आपली नौका समुद्रात ढकलतात. पोलीस प्रशासनाने या परंपरेत सहभाग घेऊन सुरक्षेची ग्वाही दिल्याने स्थानिक नागरिकांनी आणि मच्छिमारांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले. हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.