रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडली. पतसंस्थेचे चेअरमन दिनेश शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य सरचिटणीस मा. श्री. सुजितजी घरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कोकण विभागीय उपाध्यक्ष संतोष हुमणे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडिक, जिल्हा सरचिटणीस संजय दळवी, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तसेच विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी सभासद उपस्थित होते.
सभेत सन २०२५-२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी, पदोन्नती मिळालेले विस्तार अधिकारी आणि आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त अधिकारी तसेच त्यांच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
प्रमुख पाहुणे सुजित घरत यांनी मार्गदर्शन करताना पतसंस्थेच्या कारभाराचे आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच पतसंस्थेचा स्वनिधी वाढवण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले, ज्याला सभासदांनी एकमुखी मान्यता दिली.
आगामी आंदोलन: ग्रामसभेबाबत घेण्यात आलेल्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आगामी १ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित मूक मोर्चात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेचे कामकाज संपल्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार मानून व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संचालक मंडळ, जिल्हा कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी, चिपळूण तालुका संघटना तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.