कुर्ली समुद्रकिनारी मासेमारी नौकेची मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी
रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली गावच्या समुद्रकिनारी एक मासेमारी नौका आल्याने एकच खळबळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि मासेमारी नौकेच्या फॅन मध्ये कचरा अडकल्याने नौका अपघातग्रस्त झाली. वेळीच ही नौका कुर्ली समुद्रकिनारी लागल्याने मोठा अपघात टळला. शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. यावेळी या अपघातग्रस्त बोटीवर सात खलाशी होते. ही नौका मासेमारी करिता समुद्रात उतरली होती. मागील दोन दिवसांपासून समुद्रातील वातावरण खराब झाले आहे. किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांचा जोर वाढला असून खोल समुद्रात पाण्याला करंट निर्माण झाला आहे. यामुळे अनेक मच्छीमारांनी हंगामाच्या सुरुवातीलाच आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शनिवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेमुळे मच्छीमार बांधवांच्या मनात आणखी भीती निर्माण झाली आहे. मोहम्मदमिया इब्राहिम मस्तान यांच्या मालकीची ही नौका असून या नौकेचे नाव अल रिझवान असे आहे. अपघातग्रस्त बोटीवर 7 खलाशी होते. नौका अपघातग्रस्त झाली तरी बोटीवरील सर्व सातही खलाशी सुखरूप असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कुर्ली समुद्रकिनारी मासेमारी करत असताना पंख्यामध्ये जाळे अडकले व बोट वाऱ्यावरती किनाऱ्याला लागली. या दुर्घटनेत मासेमारी बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.