ऑगस्टच्या वीजबिलात ‘इंधन समायोजन शुल्क’ लागू
रत्नागिरीकरांना महावितरणचा धक्का
रत्नागिरी : उन्हाळ्यातील वाढीव वीजबिलानंतर पावसाळ्यात वीज वापर कमी झाल्याने दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या वीजग्राहकांना आता पुन्हा झटका बसण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील वीज वापरासाठी महावितरणकडून इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले असून, त्यामुळे ऑगस्टमध्ये येणाऱ्या वीजबिलात अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे. घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, औद्योगिक आणि इलेक्ट्रिक वाहनधारकांनाही या शुल्काचा फटका बसणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. या अतिरिक्त वीजखरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
घरगुती ग्राहकांच्या वीज वापराच्या श्रेणीनुसार हे शुल्क वेगवेगळे असणार आहे. दारिद्य्ररेषेखालील ग्राहकांना प्रति युनिट 10 पैसे, 100 युनिटपर्यंतच्या वापरासाठी 20 पैसे, 101 ते 300 युनिटसाठी 40 पैसे, 301 ते 500 युनिटसाठी 50 पैसे, तर 500 युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 60 पैसे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
इंधन समायोजन शुल्काचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांपुरता मर्यादित राहणार नाही. कमी दाबाच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी वापराच्या श्रेणीनुसार प्रति युनिट 40 ते 60 पैसे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे दुकाने, कार्यालये आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांच्या वीजबिलातही वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक ग्राहकांनाही या शुल्काचा सामना करावा लागणार आहे. कमी दाबाच्या औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति युनिट 25 ते 35 पैसे, तर उच्चदाबाच्या औद्योगिक ग्राहकांसाठी वापराच्या श्रेणीनुसार 30 ते 45 पैसे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
एप्रिलमध्ये नवीन वीजदर लागू करताना ग्राहकांना वीजदरात दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून वीजबिलात अतिरिक्त रक्कम जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बिलाची रक्कम वाढण्याची शक्यता असून, पावसाळ्यात वीजबिल कमी येईल या अपेक्षेवर असलेल्या सामान्य ग्राहकांना पुन्हा आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाही या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे. ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट 30 पैसे इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी ग्राहकांना पूवपेक्षा अधिक खर्च करावा लागू शकतो.