ओणी- पाचल- अनुस्कुरा घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
पाचल तालुका निर्मिती -कृती समितीचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन
पाचल:-
राजापूर तालुक्यातील ओणी ते अणुस्कुरा घाट या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती लक्षात घेता या मार्गाची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पाचल तालुका निर्मिती कृती समितीने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. याबाबत समितीचे कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन सादर केले.
राजापूर तालुक्यातून जाणारा राज्य मार्ग क्रमांक १५५ हा या परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून विविध प्रकारच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक सुरू असते. त्यातच प्रमुख आंबा घाट मार्गावर वाहतुकीसंदर्भात अडचणी निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताणही वाढला आहे. परिणामी ओणी-अणुस्कुरा घाट परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची अधिकच दुरवस्था होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खराब झालेला पृष्ठभाग यामुळे सामान्य वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची स्थिती अधिकच बिकट होत असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ओणी ते अणुस्कुरा घाट हा मार्ग राजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण व अन्य दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी मागणी समितीने केली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि प्रवाशांची ये-जा वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच ओझरे-अणुस्कुरा घाट मार्गाची आवश्यक ती दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
रस्त्याची दुरवस्था तातडीने दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम विलंब न करता पूर्ण करावे, अशी विनंती पाचल तालुका निर्मिती-कृती समितीने केली आहे. या मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागू शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, ओणी-अणुस्कुरा घाट मार्गाची दुरवस्था आणि वाढती वाहतूक लक्षात घेता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.