मोबाईल सोडून मुलांच्या हाती माती; कांचन डिजिटलच्या ‘गणपती साकारणे’ स्पर्धेत तब्बल ३५५ विद्यार्थ्यांचा नवा विक्रम!
पालकही रंगले मातीच्या कामात; रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम यशस्वी
रत्नागिरी:
लहान मुलांच्या हातातील मोबाईल काही काळ बाजूला ठेवून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने, कांचन डिजिटल रत्नागिरी आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुलांची गणपती साकारणे’ स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल पार्क येथे १६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या अनोख्या स्पर्धेत तब्बल ३५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, देशात अशा प्रकारची पहिलीच स्पर्धा ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
दरवर्षी कांचन डिजिटलच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेतली जाते. गतवर्षापासून या उपक्रमाला जोडून शालेय विद्यार्थ्यांसाठी ही मातीची मूर्ती साकारण्याची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. एवढेच नव्हे तर, स्पर्धा सुरू असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनीही स्वतः मातीत हात घालून सुंदर आणि सुबक गणपती मूर्ती साकारल्या, ज्यामुळे पालकांमधील बालपण आणि कला कौशल्यही पुन्हा एकदा अनुभवता आले.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. प्रिती सुर्वे, नगरसेवक निमेश नायर, नगरसेवक संजय हळदणकर, नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. नाहीदा सोलकर, सौ. वैभवी खेडेकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. पिलणकर, सौ. कळंबटे, सौ. रूकसार खान, सौ. पाटील, सौ. आफरीन होडेकर, तसेच उद्योजक प्रसन्न आंबुलकर आणि देवम जैन यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तसेच अनेक शाळांचे कलाशिक्षकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना कांचन मालगुंडकर यांनी स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट करत रत्नागिरी नगर परिषदेच्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. नगरसेवक निमेश नायर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी या उपक्रमाच्या उदंड यशाबद्दल कांचन मालगुंडकर यांचे विशेष कौतुक केले. भविष्यात कांचन डिजिटलतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला रत्नागिरी नगर परिषदेचे कायम पूर्ण सहकार्य राहील, असे अभिवचन त्यांनी या वेळी दिले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालस्पर्धकांना नगर परिषदेच्या वतीने खास भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमदरम्यान रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार ओंकार पाटणकर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर आपल्या हस्तकौशल्याने अत्यंत देखणी गणपती मूर्ती तयार करून दाखवली. मातीपासून मूर्ती कशी घडवावी, तिचे प्रमाणबद्ध सौंदर्य कसे जपावे, याचे थेट मार्गदर्शन त्यांनी बालमित्रांना केले. मुलांच्या हातातील डिजिटल स्क्रीन बाजूला सारून त्यांना थेट निसर्गाशी आणि मातीशी जोडण्याचे हे मोलाचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मुकेश गुंदेचा, नरेंद्र पाटील, अभिजित नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, बाळकृष्ण चव्हाण, शकील गवाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर आणि सौ. दिपीका कुबल यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण रत्नागिरी शहर व जिल्ह्यातून या उपक्रमाचे आणि बालकांच्या कलागुणांचे जोरदार कौतुक होत आहे.

