श्री छ. शिवाजी हायस्कूलचा ध्वजवंदन सोहळा उत्साहात
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी : शासकीय परिपत्रकातील सर्व दिशा-निर्देशांचे तंतोतंत पालन करत झाडगाव येथील श्री छ. शिवाजी हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, देखणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रप्रेमाची भावना, विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची प्रेरणा या मूल्यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सावधान स्थितीतील देशभक्तिपूर्ण ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनाने झाली. संपूर्ण शाळा परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला असताना शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील सर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत तालबद्ध आणि सुरेल पद्धतीने राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत, ध्वजगीत, शपथ तसेच कॉपीमुक्त प्रतिज्ञा सादर केली.
या प्रसंगी श्रीकांत ढालकर, सौ. सविता बर्वे, सुरेश उर्फ भाऊ पाटील, मोहन साळुंखे, सौ. ज्योती चौंडे, सुधीर शिंदे, सौ. सारिका भोळे, पोलीस इन्स्पेक्टर शालन शिंगाडे, सौ. संध्या चव्हाण, सौ. रत्नप्रभा शिंदे, मंगेश हरम, सौ. माधवी पाडावे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ध्वजारोहणानंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली लेझीम कवायत आणि शिस्तबद्ध संचलनाची प्रात्यक्षिके उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ढोलाच्या तालावर, देशभक्तीच्या जयघोषात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने संपूर्ण वातावरणात उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास, शिस्त, एकजूट आणि राष्ट्रप्रेमाची भावना पाहून उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणामागे शिक्षकवृंदाने घेतलेले परिश्रम आणि केलेले मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवत होते.
कार्यक्रमात शाळेचे क्रीडाशिक्षक एम. डी. पाटील सर यांनी आपल्या दमदार पहाडी आवाजात ‘निरोप’ ही कविता सादर करून उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांना भावनिक केले. देशसेवेसाठी निघालेल्या मुलाला आईकडून मिळणाऱ्या आशीर्वादाची आणि विजयाची प्रेरणा देणाऱ्या भावनिक आशयामुळे या कवितेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
तसेच शाळेच्या स्वामी विवेकानंद वसतिगृहाचे अधीक्षक श्री बागडी सर यांनी आपल्या दमदार आवाजात देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमातील देशभक्तीचा उत्साह आणखी द्विगुणित झाला.विद्यार्थ्यांच्या भाषणांनी आणि नृत्याने वाढवली कार्यक्रमाची रंगत
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, देशाप्रती नागरिकांची कर्तव्ये, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीतील विद्यार्थ्यांची भूमिका यावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली.
यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेले सुंदर नृत्य उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी प्रमुख अतिथी मा. श्रीकांत ढालकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. शाळेने केलेल्या अत्यंत सुंदर, देखण्या आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल त्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संचलन, कवायत, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शिक्षकवर्गाची मेहनत यामुळे शाळेचे वातावरण संस्कारक्षम आणि प्रेरणादायी बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक ए. डी. सुतार सर, एम. डी. पाटील सर, एन. व्ही. जाधव सर, सौ. शितूत मॅडम, ए. ए. मंडले सर, सैफुद्दीन पठाण सर, श्री सनगरे सर, श्री बागडी सर, तसेच फगरे मामा, श्री पवार मामा आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
