दामले विद्यालयात दीपोत्सवातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश
रत्नागिरी : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात दीप अमावस्येनिमित्त पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत दीपोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांनी २०० चौरस फुटाची रांगोळी साकारली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर नगरसेवक श्री . सौरभ मलुष्टे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा . श्री . सुधाकर मुरकुटे, मुख्याध्यापक श्री भगवान मोटे आदी मान्यवर उपस्थित होते . उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री . मलुष्टे म्हणाले, " दामले विद्यालय आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे नावारूपाला आले आहे . अशा शाळांमध्ये प्रवेश मिळणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे . संस्कृती जपताना पर्यावरणाचा संदेश देणारा हा दीपोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी प्रेरणा निर्माण करणार आहे . " प्रशासन अधिकारी श्री मुरकुटे म्हणाले,"गुणवत्ते बरोबरच दामले विद्यालय राबवत असलेल्या विविध अंगी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाने तब्बल 20 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणून आपला दर्जा सिद्ध केला आहे . " यावेळी त्यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश देणाऱ्या या रांगोळीच्या माध्यमातून दामले विद्यालय राबवत असलेल्या उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या . विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने साकारलेल्या या २०० चौरस फुटाच्या या भव्य रांगोळीवर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दिव्यांची आरास केली होती . विद्यार्थ्यांनी दिव्यांचे महत्त्व सांगणारी गाणी तसेच शुभंकरोती यावेळी सादर केली . यावेळी 'आधी होते मी दिवटी ... ' या गाण्याच्या आधारे दिव्यांचा दगडावरची ठिणगी ते एलईडी दिव्यापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला . यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे घेण्यात आलेल्या रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या दामले विद्यालयाच्या स्वरा कदम या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . कार्यक्रमाची प्रस्तावना श्री . मोटे सर यांनी केली . निवेदन श्री . रवींद्र शिंदे यांनी केले .