आरवली, कुंभारखाणी परिसरात बिबट्याची दहशत
संगमेश्वर: तालुक्यातील कुंभारखाणी बु, कुचांबे राजिवली, मुरुडव, आरवली परिसरात अनेक बिबटे मुक्तपणे वावरत असून ते रात्रीसह दिवसांही कुत्रे,मांजरे, गुरे,वासरे यांच्यावर हल्ले करताना दिसत आहेत.
कुंभारखाणी बु खाजगी कॅमेरेत बिबट्यानी आपल्या कुटुंबातील पिलांसाह दर्शन दिले आहे. काही दिवसांपूर्वी विजय सुर्वे यांच्या गुरांच्या कळपात बिबट्यानं हल्ला केला होता. तर अविनाश प्रताप यांच्या वासराला ठार मारले होते.
कालच मध्यरात्री १-४५ वाजता विकास सुर्वे यांच्या आरवली मुक्कामी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा शेजारी राहत्या घरी पाळीव “देवा कुत्रा” जाग्यावर पकडून ठार करण्याचा प्रसंग त्यांची पत्नी शलाका हिने खिडकीतून प्रत्यक्ष पाहिला. खुर्चीत झोपलेल्या कुत्र्याचा किरकोळ आवाज होताच शलाका यांनी दर्शनी खिडकीची स्लायडींग सरकवली. त्याचं वेळी विकास सुर्वे यांनी बाहेरील बल्ब लावला.त्यावेळी बिबटा आणि कुत्रा यांचेतील झटापट प्रत्यक्ष अनुभवली. दरवाजा उघडून पती पत्नी, पुतण्या ओंकार शेजारी महेश शिर्के, पत्नी पल्लवी शिर्के बाहेर येई पर्यंत कुत्र्याला जबड्यात पकडून बांधावरून कुत्र्यासह बिबटा शिकार घेऊन जाण्यात यशस्वी ठरला.
दुर्दैवाने गेले आठ दिवस स्ट्रीट लाईट ही बंद असल्याने बिबट्याला शिकारीसाठी आणखी पोषक वातावरण मिळाले. विनापरवाना होत असलेली जंगल तोड त्यातून जंगलातील नष्ट झालेली प्राण्यांची वसतीस्थाने, बिघडलेली जैव साखळी यामुळे हिस्त्र प्राण्यांची मानवी वस्तीतील आक्रमणे हा संघर्ष अनुभवायला मिळत आहे. गवें रेडे यांचा देखील वावर कुंभारखाणी बु परिसरात वाढला असून प्रसंगी एखाद्या घराच्या भिंती वा दरवाज्याला धक्का मारून घराची मोडतोड करून मुला माणसाना चिरंडून मानवी हानी भविष्यात पाहायला मिळाल्यास किंवा वानर आदी प्राण्यांचा वावर बंद घरात झाल्यास आश्चर्य वाटू नये.
वनखात्याकडे यां प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याने जैव साखळी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याच पद्धतीने भ्रष्टाचाराला बळी पडून विना परवाना जंगल तोड परवाना देणाऱ्यांना, पर्यावरण संतुलन बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे विचार विकास सुर्वे माजी सभापती यांनी बोलून दाखविले.
त्यानंतर म्हणजे आज मंगळवार दुपारी बारा वाजता जखमी अवस्थेत मृत्यूला हुलकावणी देऊन शूर “देवा कुत्रा” भितीने घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला. ज्या ठिकाणी त्याची रोज बसण्याची जागा होती,तिथे मात्र तो बसत अथवा थांबत नाही.माखजन पशू वैद्यकिय अधिकारी सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधला असून थोड्या वेळात ते तपासणी व औषधोपचारासाठी येत आहेत.