रत्नागिरीत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा
संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचे स्पष्ट निर्देश
रत्नागिरी:
नागरिकांना दर्जेदार, सुलभ, तत्पर आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व ग्रामीण स्तरावरील आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर व आयुष्मान आरोग्य मंदिर भिले, तसेच ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि तालुका आरोग्य अधिकारी गुहागर कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित संस्थांमधील विविध विभाग, उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या उपचारांची कसून पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा जास्तीत जास्त लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कांबळे, डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत आणि चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन संचालक डॉ. कंदेवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती सुप्रिया वंजारे, रामपूरच्या सरपंच श्रीमती अमिता चव्हाण यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य संस्थांच्या एकूण कामकाजाबाबत डॉ. कंदेवाड यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. संस्थांमध्ये चोख स्वच्छता राखणे, उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करणे आणि शासन योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.