सेवाशक्ती संघर्ष संघटनेची एसटी विभाग नियंत्रकांसोबत बैठक
कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन
रत्नागिरी: सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक अश्वदीप जानराव यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेच्या वतीने चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्यांसह प्रशासकीय त्रुटींवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या बैठकीमध्ये चालक-वाहक कर्मचाऱ्यांच्या ड्युटी अलोकेशनचा गंभीर मुद्दा प्रमुखतेने मांडण्यात आला. राजापूर, लांजा, गुहागर, खेड आणि मंडणगड आगारांमध्ये ड्युटी अलोकेशन वेळेवर न लावता रात्री ८ वाजल्यानंतर व्हॉट्सॲपवर टाकले जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मोबाईल नेटवर्कअभावी वेळेवर माहिती मिळत नसल्याने दुसऱ्या दिवशीची ड्युटी काय आहे, या संभ्रमात ते राहतात आणि यातून प्रशासनासोबत वारंवार वाद निर्माण होतात. यावर मार्ग काढत विभाग नियंत्रक अश्वदीप जानराव यांनी सर्व आगारांमध्ये ड्युटी अलोकेशन दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रसिद्ध केले जाईल, असे ठोस आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे महामंडळाच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या ओव्हरटाईम पद्धतीवरही बैठकीत सखोल चर्चा झाली.
जास्त बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अतिरिक्त ड्युटीसाठी प्राधान्याने वापरले जात असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय कामगारांच्या वैयक्तिक तक्रारींबाबत चर्चा करताना राजापूर आगाराचे चालक तेजस रायबागकर यांच्यावर झालेली कारवाई दप्तरी जमा होऊनही त्यांचे पाच दिवसांचे वेतन अद्याप दिले गेले नसल्याचा मुद्दा लावून धरण्यात आला. सोबतच अपूर्वा कदम, संदेश पवार आणि मनोज बारस्कर या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित तक्रारींवरही विस्तृत चर्चा झाली. विभाग नियंत्रकांनी या सर्व तक्रारी समजून घेत त्यांची योग्य चौकशी करून कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले.
यांत्रिक विभागातील समस्या मांडताना, काही कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बढती देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला. तसेच जबाबदार पदांवरील काही यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना उपलब्ध असला तरी प्रत्यक्षात त्यांना वाहन चालवता येत नाही, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावर यंत्र अभियंत्यांमार्फत या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला.
मागील दोन महिन्यांपासून संघटनेतर्फे देण्यात आलेल्या विविध निवेदनांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आणि बैठकीत मांडलेले सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिल्याने सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत विभाग नियंत्रक अश्वदीप जानराव यांचे आभार मानले. या बैठकीला सेवाशक्ती संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरकर, उपाध्यक्ष संजीव बने, सचिव वसंत कांबळे, निलेश आखाडे यांच्यासह विविध आगारांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.