फसवणुकीचा नवा फंडा; कुवारबाव येथे महिलेची मुल होण्याच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक
रत्नागिरी
शहरातील मानस रेसिडेन्सी-कुवारबाव साईनगर परिसरात मुल होण्यासाठी औषध तयार करुन विधी करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात महिलांनी एका गृहिणीची फसवणूक करत घरातील तब्बल १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घटली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
हि घटना १६ जुलैला दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास रुम क्र. २ मानस रेसिडेन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ रत्नागिरी येथे घडली. या बाबत सान्वी सुमित आंब्रे (वय ३०, रा. मानस रेसिडेन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सान्वी आंब्रे या घरी असताना दोन अज्ञात महिला त्यांच्या घरी आल्या. मुल होण्यासाठी औषध तयार करुन विधी करण्याच्या बहाण्याने त्यांनी घरात प्रवेश केला. यातील एका महिलेने पंजाबी ड्रेस तर दुसऱ्या महिलेने साडी परिधान केली होती. दोन्ही महिलांनी विविध प्रकारच्या गोष्टी सांगून आंब्रे यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने एका कागदामध्ये बांधून ते साडीमध्ये गुंडाळून ठेवत असल्याचे नाटक केले. या प्रकारामुळे आंब्रे यांचा विश्वास बसल्यानंतर संबंधित महिलांनी त्याच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले आणि तेथून पोबारा केला.
चोरुन नेलल्या दागिन्यामध्ये सुमारे दीड तोळे वजनाचे दोन सर असलेले मंगळसूत्र, त्यामध्ये सोन्याच्या दोन छोट्या वाट्या व काळेमळी तसेच दीड तोळे वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्सचा जोड यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ४४ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सान्वी आंब्रे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात दोन महिलांविरुद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला असून या महिलांचा शोध घेण्याचा तपास सुरु आहे.