रत्नागिरीतील भगवती बंदर क्रुझ टर्मिनल प्रकल्पाला गती
पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला आता वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
मंत्रालयात नुकतीच भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्याबाबत एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकण किनारपट्टीची लाभलेली नैसर्गिक संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि अफाट पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथील क्रुझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना
क्रुझ टर्मिनलच्या निर्मितीमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पाचा थेट लाभ अनेक क्षेत्रांना मिळणार आहे. यामध्ये
पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय, परिवहन क्षेत्रातील वाहतूक आणि पर्यटन मार्गदर्शक (टूर गाईड्स) सेवा, स्थानिक उद्योग क्षेत्रात हस्तकला उत्पादने, मत्स्यव्यवसाय आणि विविध लघुउद्योग यांना याचा थेट फायदा होणार आहे.
स्थानिक व्यावसायिकांना नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन परिसराच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रशासकीय निर्देश
मंजुरी आणि अहवाल: या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच, टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी पूर्ण झाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम टप्प्यात आहे.
मंत्री महोदयांचे निर्देश: प्रकल्पाची सर्व कामे उच्च दर्जाची आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता वेगाने करावी, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
शाश्वत विकास: स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देतानाच आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर हा प्रकल्प उभा राहावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.