लक्ष्मी ऑरगॉनिक्स कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगात याचिका
‘स्वतंत्र कोकण राज्य’ अभियानाची आक्रमक भूमिका
रत्नागिरी:
औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘लक्ष्मी ऑरगॉनिक्स’ या केमिकल कंपनीत ‘पिपास’ सारख्या अत्यंत धोकादायक आणि विषारी रसायनाची निर्मिती केली जात असून, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणाचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर मुद्याची दखल घेत ‘स्वतंत्र कोकण राज्य’ निर्मिती अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी मानवी हक्क आयोगाकडे सदर कंपनी कायमची बंद करण्यात यावी, या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर मानवी हक्क आयोगासमोर सुनावणी पार पडली असून आयोगाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी निश्चित केली आहे.
या सुनावणी दरम्यान कोकणच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे प्रमुख नेतृत्व आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवी हक्क आयोगाच्या दालनात झालेल्या या सुनावणीला स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांच्यासह आंदोलनातील सहकारी अशोकराव जाधव, कोकणरत्न मुरलीधर करंगुटकर, कोकणरत्न डॉ. लीलाधर पाटकर, कोकण रत्न विशाल बांदवलकर, आणि कोकण उद्योग अभियानाचे प्रमुख योगेश पांचाळ यांनी विशेष उपस्थिती लावली.
कायदेशीर बाजू मांडताना ॲडव्होकेट सोपान बुरबाडकर यांनी कंपनीकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर आणि विषारी वायूमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर आयोगाचे लक्ष वेधले. याचिकेला भक्कम पाठिंबा देण्यासाठी कोकण मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मेहमूदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते मुकेश जय, सुरेश रानडे, डॉ. मंगेश सावंत, सुनील जाधव आणि आल्हाद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मी ऑरगॉनिक कंपनीत तयार होणारे ‘पिपास’ हे रसायन अत्यंत विषारी असून, त्याच्या संपर्कामुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. स्थानिक भागात प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या जीविताचा हक्क धोक्यात आला आहे, असा गंभीर आरोप संजय कोकरे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. कोकणातील निसर्ग आणि जनतेचे आरोग्य वाचवण्यासाठी ही घातक कंपनी बंद करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानवी हक्क आयोगाने दोन्ही बाजूंची प्राथमिक मांडणी ऐकून घेत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर बाबी आणि पुराव्यांची तपासणी करण्यासाठी आयोगाने १४ ऑक्टोबर ही पुढील तारीख दिली आहे. दरम्यान, कोकणच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.