‘सायबर शिक्षेतून सायबर सुरक्षा’मधून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा जागर
रत्नागिरी
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या सायबर वॉरियर क्लबच्या वतीने, क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने सायबर शिक्षेतून सायबर सुरक्षा या सायबर जनजागृती अभियानांतर्गत खेडशी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट, मोबाईल आणि सामाजिक माध्यमांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच विविध ऑनलाइन फसवणुकींपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता.
या सत्रात मॉर्फिंग, ओटीपी फसवणूक, मोबाईलचे अतिवापर व त्याचे परिणाम, सुरक्षित पासवर्ड, अॅप परवानग्या यांसह सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि संशयास्पद संदेश किंवा लिंकपासून सावध राहणे यावरही भर देण्यात आला.
सत्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे परस्परसंवादी पद्धतीने झालेला संवाद. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्न विचारले आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे सायबर सुरक्षेचे विषय विद्यार्थ्यांना अधिक सहजपणे समजून घेता आले.

सायबर वॉरियर्स सृष्टी पाटील, श्रावण बोथले, अथर्व सावंत आणि अनुष्का देसाई यांनी सत्राच्या आयोजनात व मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उपक्रमाला ३७२ विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.
सत्रानंतर विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. सुरक्षित पासवर्ड वापरणे, ओटीपी न सांगणे, अॅपच्या परवानग्या तपासणे आणि मोबाईलचा जबाबदारीने वापर करणे यांसारख्या सवयी अंगीकारण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
‘सजग विद्यार्थी, सुरक्षित डिजिटल भविष्य आणि सायबर सुरक्षित भारत’ या उद्देशाने अशा जनजागृती उपक्रमांची गरज असून, प्रत्येकाने डिजिटल जगात जबाबदारीने वावरल्यास ‘सायबर सुरक्षित भारत’ घडविण्यास निश्चितच हातभार लागेल.