भविष्यात सामाजिक शास्त्रांना अधिक महत्त्व- डॉ. विवेक बेल्हेकर
‘गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन
रत्नागिरी,: मानसशास्त्र हे मानवी मन, वर्तन, विचार आणि भावनांचा शास्त्रीय अभ्यास करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. कौटुंबिक-सामाजिक नातेसंबंध व सुसंवाद, व्यक्तीचे मानसिक-सामाजिक आरोग्य, ताणतणाव व त्यांचे व्यवस्थापन, निर्णयक्षमता, व्यक्तिमत्व विकास अशा विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. सध्या मानसोपचार तज्ज्ञांची मागणी वाढत असल्याने या विषयात करिअरच्या संधींकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या विषयातील ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी येथे केले.
गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. (मानसशास्त्र) अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा अभ्यासक्रम म्हणजे एक धाडसी पाऊल असून यामुळे कोकणातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयातील दर्जेदार आणि संशोधनावर आधारित उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, जिल्हा शासकीय रुग्णालयातील चिकीत्सक मानसोपचारतज्ज्ञ नितीन लोणिष्टे, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. सीमा कदम, डॉ. कल्पना आठल्ये आदी उपस्थित होते.
कला शाखा उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. समाजाच्या सर्वांगीण पैलूंचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक शास्त्रे महत्त्वाची असून, दिवसागणिक त्यांचे उपयोजन वाढत असल्याचे ते म्हणाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एम. ए. मानसशास्त्र अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या एमयू- प्रज्ञा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
निवृत्त प्राध्यापक आणि समुपदेशक प्रा. माणिकराव बाबर यांनी आपल्या मनोगतातून मानसशास्त्राचा इतिहास, त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोजन यावर प्रकाश टाकून भारतात अद्यापही या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त केली.
र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान व आध्यात्म, योगशास्त्र यातून मनाला मानसिक – भावनिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम कसे करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असून, प्रत्येकाने त्याबाबत जागरूक असले पाहिजे. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. साहिल बोथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती घडशी यांनी आभार मानले.