मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे उपक्रम साजरा
रत्नागिरी: महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष सेवाभावी संस्था, रत्नागिरी तसेच भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी उपाध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या पुढाकारातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल, झाडगाव-रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य तथा भाजपचे आमदार प्रमोद जठार हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाची माहिती देताना, शाळेतील अनेक विद्यार्थी हे वसतिगृहात राहून शिक्षण घेत असल्याचे सांगितले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री प्रमोदजी जठार यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी आमदार निधीतून विद्यालयाच्या विकासासाठी१० लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा समाजाभिमुख उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरला. नव्या गणवेशांचा लाभ मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
समाजहित, शिक्षणप्रेम आणि विद्यार्थ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका वर्षाताई ढेकणे, राजू भाटलेकर, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेविका सुप्रिया रसाळ, दादा ढेकणे, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, भाजप शहर सचिव सचिन गांधी यांच्यासह श्री सुतार सर, एम. डी. पाटील सर, अमोल मंडले सर, नवनाथ जाधव सर, श्री. सावंत सर, श्री. सनगरे सर, श्री. बागडी सर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैफुद्दीन पठाण सर यांनी प्रभावीपणे केले, तर गौरी शितूत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.