पाडावेवाडी बससेवा पूर्ववत करण्यासाठी अभाविप आक्रमक
रत्नागिरी आगार व्यवस्थापकांना निवेदन
रत्नागिरी:
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा मिळावी या मुख्य उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. १ ऑगस्ट रोजी अभाविपच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी आगार व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
शिर्के प्रशाला येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी पाडावेवाडी शहर बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही बससेवा कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी अभाविपने या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाची ही समस्या अत्यंत गंभीर असून सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी एसटी बस हा एकमेव सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध असतो. मात्र ही बस बंद पडल्यामुळे दररोज जवळपास ३० ते ४० विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेवर वाहन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोच, शिवाय त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन शैक्षणिक नुकसानही सोसावे लागत आहे. ही बससेवा पुन्हा सुरळीत सुरू झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित, वेळेवर आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल आणि त्यांची मोठी शैक्षणिक अडचण दूर होईल, असा विश्वास अभाविपच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरीचे कार्यालयमंत्री चारुदत्त भडसावळे आणि शहर सहमंत्री यश काळे यांनी आगाराच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन एसटी महामंडळ प्रशासनाने या विषयावर गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करावा तसेच लवकरात लवकर ही बस पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असा पुनरुच्चार प्रतिनिधींनी केला. यावर आगार व्यवस्थापकांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.