तुळसुंदे फाटा येथे मटका जुगार चालवणाऱ्यावर गुन्हा
राजापूर:
राजापूर तालुक्यातील तुळसुंदे फाटा परिसरात विनापरवाना मटका जुगार खेळवणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी सायंकाळी ७:३६ वाजण्याच्या सुमारास तुळसुंदे फाटा येथील नार्वेकर किराणा दुकानाचे पाठीमागे असलेल्या पडक्या शेडजवळ ही कारवाई करण्यात आली.
आरोपी विशाल अशोक सुर्वे (वय ३८ वर्षे, रा. तुळसुंदे उगवतीवाडी, नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा कोणतीही परवानगी किंवा परवाना नसताना स्वतःच्या ताब्यात मुंबई मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम बाळगून स्वतः जुगार खेळवत असताना मिळून आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरीचे पोलीस हवालदार विक्रम अंबाजी पाटील (पोहेकॉ/३३८) यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ३० जुलै रोजी रात्री १०:२४ वाजता गु.र.नं. ७५/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १,२१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १,२१० रुपये रोख रक्कम आणि मटका जुगाराचे इतर साहित्य समाविष्ट आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.