राजापुरातील मोकाट गुरांबाबत न. प. प्रशासनाची धडक कारवाई
शहरात मोकाट फिरणारी १५ गुरे पडकली
मालकांनी प्रतिसाद न दिल्याने आता या गुरांची रवानगी चिपळूणच्या गो शाळेत
भटक्या कुत्र्यांची होणार नसबंदी
राजापूर: शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या विरोधात नगर परिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत नगर परिषद प्रशासनाने शहरात मोकाट फिरणारी १५ गुरे पडकडून त्यांची कोंडवाडयात रवानगी केली आहे. तर भटक्या कुत्र्यांच्या निर्जिबीकरणासाठी निवीदा प्रसिध्द करण्यात आली असुन शहरातील या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे.
प्रशासनाने ज्या १५ मोकाट गुरांना पकडून कोंडवाडयात ठेवले आहे, त्यांच्या मालकांनी त्यांना सोडवून न्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. मात्र अद्याप पर्यंत कुणीही मालक गुरे सोडविण्यासाठी आलेले नाहीत, त्यामुळे आता या गुरांची वैद्यकिय तपासणी करून त्यांना चिपळूण येथील गोशाळेत सोडले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजापूर शहरात गेले काही दिवस मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत नागरिक, वाहन चालक यांच्यातुन वारंवार तक्रारी पुढे येत आहेत. भर स्त्यात तसेच बाजारपेठेत या मोकाट गुरांचा वावर दिसून येत आहे, तर गेल्या काही दिवसात शहरातील रस्ते व सार्वजिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरत आहेत.
नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही यावर चर्चा झाली. यावेळी जर का मोकाट गुरे पकडून कोंडवाडयात ठेवल्यानंतर आवाहन करूनही जर का कुणी गुरांचे मालक आले नाहीत तर मग या गुरांना गोशाळेत सोडण्याबाबतचा निर्णय या सभेत घेण्यात आला होता. आता प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
महिनाभरापुर्वी न. प. प्रशासनाने पाच मोकाट गुरे पकडून कोंडवाडयात ठेवली होती. त्यानंतर पुन्हा मोहिम राबविण्यात आली व गेल्या आठवडा भराता आणखी दहा गुरे पकडण्यात आली आहेत. याबाबत ज्यांची गुरे आहेत त्यांनी न. प. प्रशासनाशी संपर्क करून ती सोडवून घेऊन जावीत असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र गुरूवार अखेर पर्यंत कुणीही गुरांच्या मालकांनी याबाबत दखल घेतलेली नाही.
आता या गुरांची राजापूर पशुधन अधिकारी यांच्याकडून वैद्यकिय तपासणी करून घेण्यात येणार असुन त्यानंतर पुढील दोन दिवसांत ही गुरे नगर परिषद प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून चिपळूण येथील गोशाळेत सोडणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तर भटक्या कुत्र्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाणार असून त्यांच्या निर्बीजीकरणासाठी निवीदा प्रक्रिया पुर्ण झाली असून त्याबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. नगर परिषदेने घेतलेल्या या कडक अंमलबजावणीचे नागरिक, व्यापारी व वाहन चालक यांनी स्वागत केले आहे.