मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ची स्थापना
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या मराठी भाषा आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ची स्थापना करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार, विद्यार्थ्यांचे मराठी भाषिक कौशल्य विकसित करणे, मराठी साहित्याची आवड निर्माण करणे तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित मराठी साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या क्लब स्थापनेचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. चौधरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून कांदळवन प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री. ऋषीकेश भाटकर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. चौधरी यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा तसेच शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करत मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि दैनंदिन वापरासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यालय अधीक्षक श्री. सचिन जाधव यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मराठी भाषा क्लबच्या संरचना व मार्गदर्शक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच क्लबच्या पहिल्या सभेत कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. क्लबच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन, राजभाषा दिन, साहित्य वाचन, लेखन, वक्तृत्व, निबंध, कार्यशाळा, परिसंवाद तसेच विविध भाषिक व सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय प्रभारी अधिकारी श्री. अभिजित पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सहाय्यक प्राध्यापक एन. बी. मिरजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रभावी वापराचा संकल्प व्यक्त केला.