राजापुरात भरधाव ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
राजापूर: रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालकाविरुद्ध राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवीदास आडबे (वय ३०) हे २९ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास नाटे ते धारतळे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. त्यावेळी वाघेडी बस स्टॉपसमोर आल्यावर, नाटेकडून धारतळेकडे जाणारा सॉलिस ट्रॅक्टर (क्र. केओ २८ टीओ ७३९०) ट्रॉलीसह जात होता.
या ट्रॅक्टरचा चालक हरी लक्ष्मण हाके (वय २८, रा. मु.पो. नाटे गणेशनगर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवताना दिसून आला. याप्रकरणी पोलीस नाईक फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलिसांत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.