स्व. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रम
रत्नागिरी :श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव – रत्नागिरी येथे संस्थेच्या पहिल्या महिला सचिवा, ज्ञानज्योती स्वर्गीय प्रा. सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. प्रा. सौ. शुभांगी गावडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून दोन मिनिटे मौन पाळत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता नववीचा विद्यार्थी सोहम खोत याने स्व. प्रा. सौ. शुभांगी गावडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थाविकासातील मोलाच्या कार्याचा प्रभावी आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागवलेली प्रेरणा, संस्कारमूल्यांची जोपासना आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले नेतृत्व याविषयी त्याने मनोगतातून कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्व. प्रा. सौ. शुभांगी गावडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, शिक्षण, संस्कार, शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोन यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येत होता. संस्थेच्या पहिल्या महिला सचिवा म्हणून त्यांनी दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि सेवाभाव यांच्या बळावर संस्थेच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे कार्य आजही शिक्षक, विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक श्री ए. डी. पाटील यांच्या हस्ते तसेच शिक्षकवृंदाच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. “वृक्ष संवर्धन हीच भावी पिढीची खरी सेवा” हा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैफुद्दीन पठाण यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत स्व. प्रा. सौ. शुभांगी गावडे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार श्री सुतार सर यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्व. प्रा. सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारून शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची परंपरा अधिक सक्षम करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास एम. डी. पाटील, नवनाथ जाधव, गजानन बागडी, श्री फगरे मामा, श्री पवार मामा तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.