रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाची भव्य ‘राष्ट्रसंरक्षण मूकपदयात्रा’
नीट परीक्षा वादाच्या आडून चाललेल्या अराजकतेचा जाहीर निषेध
रत्नागिरी:
नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्याचे भांडवल करत देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या देशद्रोही वृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध करण्यासाठी आज रत्नागिरी शहरात संविधान सन्मान मंचाच्या वतीने भव्य ‘राष्ट्रसंरक्षण मूकपदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. “शांततेतून शक्ती, एकतेतून परिवर्तन” असा ठाम संदेश देत या मूक पदयात्रेच्या माध्यमातून हजारो राष्ट्रप्रेमींनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला.
सकाळी शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मूकपदयात्रेला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने ही पदयात्रा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. हा संपूर्ण परिसर ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने आणि देशभक्तीच्या वातावरणाने व्यापून गेला होता.
देशाची आरोग्य सेवा ही केवळ एक व्यवस्था नसून ती थेट राष्ट्रसंख्येशी आणि राष्ट्रसेवेशी जोडलेली आहे. परंतु, नीट परीक्षेच्या नावाखाली सातत्याने गोंधळ घालून आणि अपप्रचार करून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या अराजकतेचा थेट विपरीत परिणाम भविष्यातील आरोग्यव्यवस्थेवर आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेवर होत आहे. परीक्षेतील त्रुटींचे कारण पुढे करत देशाला अस्थिर आणि असुरक्षित करण्याचा जो कट रचला जात आहे, ही राष्ट्रद्रोही वृत्ती समूळ खोडून काढण्यासाठीच ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे मंचाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या मूकपदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांच्या हातांतील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. “आज आमचे मौन बोलेल, राष्ट्रप्रेम जग ऐकेल”, “आजचा संकल्प, उद्याचा सुरक्षित भारत” अशा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आणि ज्वलंत आशयाच्या बॅनरद्वारे आंदोलकांनी आपला संदेश दिला. कोणताही गदारोळ न करता, केवळ मौन बाळगून दिलेला हा लढा अधिक प्रभावी ठरल्याचे पाहायला मिळाले.
या मूकपदयात्रेत हजारो सामान्य नागरिक, तरुण-विद्यार्थी आणि राष्ट्रप्रेमींसोबतच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षभेद बाजूला ठेवून केवळ राष्ट्राच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्वजण या पदयात्रेत एकमुखाने सहभागी झाले होते. मारुती मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर नागरिकांनीही या पदयात्रेचे शांततेत स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ऐतिहासिक पदयात्रेची सांगता करण्यात आली.


