मिऱ्या-नागपूर महामार्ग बनतोय मोकाट गुरांचा अड्डा; अपघाताची टांगती तलवार!
रत्नागिरी:
रत्नागिरी शहराला इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडणाऱ्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या ‘मिऱ्या-नागपूर’ या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोकाट गुरांचा मोठा विळखा पडला आहे. ‘ जे.के फाईल परिसरात या महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा उनाड गुरांचेच राज्य पाहायला मिळत असून, हा महामार्ग अक्षरशः गुरांचा अड्डा बनल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी होईल, वाहनधारकांचा वेळ वाचेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे उलटे दिसत आहे. साळवी स्टॉप ते लगतच्या परिसरात महामार्गाच्या अगदी मध्यभागी रस्त्यावर दिवस-रात्र गुरांचे थवेच्या थवे बसलेले पाहायला मिळत आहेत.
या परिस्थितीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लहान-मोठ्या वाहनधारकांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. दुचाकी, रिक्षा, चारचाकी गाड्या तसेच अवजड वाहना चालकांना अक्षरशः जीवाची बाजी लावून आणि अगदी कसरती करत या भागातून मार्गक्रमण करावे लागत आहे. भरधाव वेगात असलेल्या वाहनांसमोर अचानक गुरे येत असल्याने अथवा रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसलेल्या गुरांमुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून एखादी मोठी जीवघेणी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ अपघाताचा धोकाच नाही, तर रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणाऱ्या या गुरांमुळे दररोज या परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे. अनेकदा सुजाण वाहनचालक आपली वाहने बाजूला थांबवून या गुरांना रस्त्यावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात; परंतु ही उनाड गुरे थेट अंगावर धावून येत असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना माघार घ्यावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा पूर्णपणे नाईलाज होत आहे.
इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही स्थानिक प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या या गुरांचे मालक कोण? त्यांच्यावर पोलीस किंवा प्रशासन काही कारवाई करणार का? आणि या मोकाट गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केली जाणार का? असा संतप्त सवाल आता साळवी स्टॉप परिसरातील स्थानिक रहिवासी आणि नियमित प्रवास करणारे वाहनचालक उपस्थित करत आहेत. एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी सर्वस्तरातून होत आहे.
