रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले भव्य मराठी भाषा संग्रहालय; २५ कोटींचा निधी मंजूर!
रत्नागिरी:
महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शहरात १ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील सन्मित्र नगर या मध्यवर्ती ठिकाणी हे मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार असून, मराठी भाषेचा इतिहास, समृद्धी आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे संग्रहालय राज्यातील पहिलेच मानबिंदू ठरेल. या संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध बोलीभाषांवर सखोल संशोधन केले जाणार असून, ज्या महनीय व्यक्तींनी आणि साहित्यिकांनी मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान दिले आहे, त्यांच्या साहित्याचा संशोधन व संग्रह येथे केला जाईल.
‘पुस्तकांचे गाव’ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा
रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात ‘पुस्तकांचे गाव’ विकसित केले जाणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, कवीवर्य मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, केशवसुत, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांचा ऐतिहासिक व साहित्यिक वारसा रत्नागिरीच्या भूमीला लाभला आहे. याच समृद्ध सांस्कृतिक मांदियाळीमुळे महाराष्ट्रातील हे पहिले भाषा संग्रहालय रत्नागिरीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधन थकबाकीवर मोठा निर्णय; रत्नागिरीच्या शासकीय व ग्रामीण रुग्णालयांत आरोग्य सुविधांचा विस्तार वाढणार!
रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत विविध विकासकामांचा आणि निर्णयांचा धडाका.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना काळात जिवाचे रान करून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनाची रक्कम आता नियमितपणे दिली जाणार असून, त्यांच्या प्रलंबित मानधनाचे सर्व पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात या सेविकांनी घरोघरी जाऊन कोण पॉझिटिव्ह आणि कोण नाही, याची माहिती घेत औषधोपचार पोहोचवण्याचे मोलाचे काम केले होते. त्यामुळे त्यांच्यामुळेच आपण जगत आहोत, अशी भावना व्यक्त करत यापुढे त्यांचे पैसे रखडणार नाहीत, असा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसेच जिल्ह्यातील महिला भगिनींना प्रत्येकी अठरा हजार रुपये देण्याच्या विषयावर दोन टप्प्यांत निर्णय झाला असून, दोन दिवसांत त्यांना अर्धे पैसे आणि पुढील दोन महिन्यांत उर्वरित रक्कम दिली जाईल.
या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सामंत यांनी मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालयाबाबतही मोठी माहिती दिली. मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी ६९३ कोटी रुपये जायकामधून मंजूर झाले असून त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) ओपीडीची संख्या ३५० वरून वाढून साडेआठशेपर्यंत पोहोचली असून, येथे मायनर व मेजर अशा तब्बल १,३८२ हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि उपचारांना वेग देण्यासाठी डीपीसीमधून हीमोफिलियाच्या इंजेक्शनसाठी ५० लाख, ऑर्थोपेडिक यंत्रणेसाठी २० लाख आणि ऑक्सिजनच्या प्रगत उपकरणांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेषतः महिलांच्या वॉर्डमध्ये पुरुष नातेवाईकांना प्रवेशबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, केवळ अतितातयी प्रसंगीच ३-४ कुटुंबीयांची नावे नोंदवून प्रवेश दिला जाईल, जेणेकरून महिला रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. ग्रामीण रुग्णालयांमध्येही ओपीडीची संख्या वाढली असून नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.