जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर नदीत कोसळल्याप्रकरणी मृत चालकाविरुद्ध गुन्हा
खेड :
खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पुलावर कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो पुलाचा डिव्हायडर तोडून थेट नदीच्या पात्रात खाली पाण्यात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे कंटेनरचालकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मृत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, यासंदर्भातील गुन्हा दिनांक २३ जुलै रोजी रात्री ८:५० वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी चालक मिथिलेश कुमार निषाद हा आपला कंटेनर (क्रमांक MH.43 Y 3761) अत्यंत निष्काळजीपणे, हयगयीने आणि रस्त्याची विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून नेत होता. तो खेडमधील जगबुडी नदीच्या ब्रिजवर आला असता, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्याच्या मधोमध असलेला डिव्हायडर तोडून दोन्ही ब्रिजच्या फटीमधून थेट खाली जगबुडी नदीच्या पात्रात पाण्यात कोसळला.
या भीषण अपघातात चालकाला स्वतःला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवला. तो स्वतःच्या मृत्यूस व अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.