पाचल येथे कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा
१२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
राजापूर:
पाचल हनुमाननगर परिसरात कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या एका इसमावर राजापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रायपाटण पोलीस दुरक्षेत्राच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील प्रताप घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदकुमार देविदास खानवीलकर (वय ४८, रा. पाचल, पेठवाडी) याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास पाचल येथील हनुमान मंदिराच्या मागील बाजूच्या रस्त्यावर आरोपी नंदकुमार खानवीलकर हा बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रायपाटण दुरक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९१/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.